रानडे च्या शेजारील खाउ गल्लीत, मित्रांसोबत मस्त वाफाळलेला,गरमा-गरम चहा मारत गप्पा चालु असताना,एकाने कोथरुड येथील महात्मा सोसायटी मध्ये महिलेला मारहाण झाली असे सांगितले.माझे कान जरा अधिकच टवकारले कारण, ही बातमी पत्रकारितेमधील ‘ह्युमन इंटरेस्ट’ या प्रकारात मोडत होती (कदाचित मी ही महात्मा सोसायटीत रहात असल्याने). गप्पा पुढे सरकल्या पण माझी गाडी मात्र तिथेच अडकली.डोक्यातील विचारांनी आता हातातील वाफाळलेल्या चहावर मात केली होती.
अरुणा शानबाग,मथुरा केस,अंजना मिस्रा केस,निर्भया मार्गे कोपर्डी अन आता चक्क आमच्या कोथरुड मध्येच? मन सुन्न झाले.उत्क्रांतीचा माकडापासुन माणुस असा सुरु झालेला प्रवास आता परत उलट्या दिशेने होउ लागला आहे.कोथरुड मधील घटना तर सो काॅल्ड ‘सुशिक्षित’ व्यक्ती कडुन केलेली आहे.मुळातच आपण सुशिक्षित झालो म्हणजे नक्की काय झालो? १ किंवा २ प्रमाणपत्र मिळाले की, खरेच होतो का ओ आपण सुशिक्षित? अशी १ किंवा २ प्रमाणपत्रे मिळाली म्हणजे,समाजात कसेही स्वैराचाराने फिरायचे लायसन्स मिळाल्यासारखे वाटणे हेच मुळी आमच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.’सुशिक्षित’ आणि ‘असुशिक्षित’ याच्यातील भेद दर्शवणारी रेषा आता पुसट होत आहे आणि म्हणुनच ‘सुशिक्षित’ या शब्दाची व्याख्या बदलण्याची गरज आली आहे.
कुत्र्याचा उपद्रव होउ नये म्हणुन त्या व्यक्तीने महिलेला मारहाण केली,या घटनेे मागे तात्कालीन कारण जरी कुत्रा हा प्राणी असला तरी,त्याची पाळेमुळे समाजातील पुरुषसत्ताक पद्धत,शिक्षणपद्धत,सत्तेतुन आलेला माज,श्रीमंती,व्यवस्थेचे अपयश अशा अनेक पातळ्यांवर आपणास पहावयास मिळतील. उचललेला हात असो वा बलात्कारी मनोवृत्ती ही काही क्षणीक विचारांतुन आलेली नसते तर, त्याच्या मागे एक दिर्घ,वारंवार केलेला विचारप्रवाह असतो की ज्याला ईंग्रजीत ‘थाॅट प्रोसेस’ असे म्हटले जाते.वरिल प्रश्नाचा उहापोह करताना आपणास याच ‘थाॅट प्रोसेस’ चा अभ्यास करावा लागेल.
सत्तेतुन आलेला माज यासाठी की, त्या व्यक्तीची पत्नी ही शासकीय अधिकारी वर्ग १ आहे.तिच्या पदाचा असा गैरवापर करुन अंगी भिनलेल्या माजुरडेपणातुनच हे कृत्य घडले.आपल्या श्रीमंतीने व्यवस्थेला वाकवण्याची सवय आणि त्यामुळेच अशा लोकांना सिस्टिम ची भितीच राहिली नाही अन मग यातुनच असे गुन्हेगारीवृत्तीचे क्रृत्य करण्यास हे धजावत नाहीत.
एकवेळ जरी आपण असे मानले की, या प्रकरणामध्ये त्या बाईची ही चुक असेल पण म्हणुन त्यांच्यावर हात उचलणार? बुटाने त्यांना मारणार ? गुन्हा काय तर कुत्रा पाळला म्हणुन ? खरचं ईतक्या बोथट झाल्यात आपल्या जाणिवा? जिथे जाणिवा संपतात, बोथट होतात तिथे माणुस हा माणुस रहात नाही तो एक ‘जिंदा लाश’ बनुन रहातो.माणसाच्या माणुस पणाच्या लक्षणांत जाणिवेला खुप महत्त्व आहे,माणसाच्या जाणिवा-नेणिवा या व्यक्तिसापेक्ष आहेत,या जाणिवा-नेणिवेच्या कक्षा रुंदावण्यासाठी शिक्षणाबरोबरच सामाजिक भान ही महत्त्वाचे ठरते.
जाणिवा-नेणिवेच्या या द्वैतामधुन भानावर आलो.बघतो तर, हातातील वाफाळलेला,गरमागरम चहा एव्हाना थंड झाला होता.मित्रांनीही कलटी मारली होती.परत एक नविन,गरमागरम,पहिल्या धारेचा चहा मारुन मग मी ही रानडेची वाट धरली माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदावण्यासाठी,स्वत:ला नेणिवेच्या पातळीवर सिद्ध करण्यासाठी.
By -
s.Suresh
(shrinivas Suresh)
No comments:
Post a Comment