Saturday, 28 January 2017

रईस च्या 'काबिलीयत' वर प्रश्नचिन्ह




दिग्दर्शक राहुल ढोलकिया ‘परझानिया’ नंतर ‘रईस’ द्वारे पुन्हा एकदा गुजरात मधील परिस्थितीवर भाष्य करु पहात आहे (नमो नम:). यावेळेस त्यांच्या सोबत आहे किंग खान पण चावून चोथा झालेल्या कथानकापुढे किंग खान तर काय करणार बिचारा!! चित्रपट प्रदर्शनापूर्वी  कैलास विजयवर्गीय यांचे ट्विट,पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचा चित्रपटातील सहभाग,शिय्या पंथीय मुस्लिमांच्या भावना दुखावणे,प्रदर्शन तारीख अशा वादांमध्ये अडकला असतानाच (नविन मार्केटिंग स्टाईल) बॉक्स ऑफिस कलेक्शन वर याचा किती परिणाम होतो हे पहाणे गरजेचे आहे.
  चित्रपटातील कथानकाचा वास्तवाशी काहीही संबंध नाही असा दावा जरी दिग्दर्शक राहुल ढोलकिया करत असले तरी खरे काय हे समजण्या इतपत प्रेक्षक नक्कीच ‘काबिल’ आहेत.रईस ची कथा गुजरात मधील दारु माफ़िया अब्दुल लतीफ याच्या जीवनावर आधारित आहे.८०-९० च्या दशकामधील कथानक पडद्यावर साकारण्यामध्ये दिग्दर्शक राहुल यशस्वी ठरले आहेत.रईस आलम (शाहरुख़ खान) त्याच्या आईसोबत गरीबी मध्ये रहात असतात.पैशासाठी लहानपणा पासुनच तो जयराज शेठ (अतुल कुलकर्णी) साठी काम करत असतो. या कामा मध्ये त्याला सादिक़ (मोहम्मद ज़ीशान अय्यूब) मदत करत असतो.”कोई भी धंदा छोटा नही होता और, धंदे से बडा कोई धर्म नही होता” असा आईने दिलेला सल्ला लक्षात ठेवुन विजिगिषु वृत्ती मुळे धंद्यात तो एक मोठा खेळाडु बनतो.रईस च्या जीवनात पुढे रोमान्स,अॅक्शन,यातुन राजकारण कसे येते ? धंदा करत असताना स्वतःची तत्वे आणि ती जपण्यासाठी चा संघर्ष,मुजुमदार (नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी) त्याला वेळोवेळी कसा विरोध करतो ? वाईट धंदे करुन देखिल रईस मसिहा कसा बनतो? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट बघितल्या नंतरच मिळतील.


    चित्रपटाची गाडी मध्यांतरानंतर रुळावरुन घसरल्याचे जाणवते.शाहरुख खान च्या हातात चित्रपटाचे स्टिअरींग आहे.नायिका आसिया (माहिरा ख़ान) हि अभिनया मध्ये तितकी सरस वाटत नाही. चित्रपटातील एका सीन मध्ये आसिया गर्भवती असताना तीचे पोट दाखविण्यास दिग्दर्शक कदाचित विसरला असावा.यामध्ये भर म्हणुन की काय,मध्यांतरा आधी आणि नंतर असे दोन खलनायक असणारे दोन वेगवेगळे चित्रपट पाहिल्या सारखे वाटते. सनी चे आयटम साॅंग आणि त्याचवेळी पडद्यावर येणारी दृश्ये यांचा संबंध सुटल्यासारखा वाटतो.बाॅलिवुड मध्ये बर्याचदा वापरण्यात आलेल्या कथानकाच्या धर्तीवर असणारा हा चित्रपट आणि उगाचच नायकाला ‘गरिबोंका मसिहा’ दाखवण्यासाठी कथानकामध्ये ओढुनताणून आणलेले राजकारण,दहशतवाद यांमुळे चित्रपट फक्त एकदा बघण्यापुरताच मर्यादित रहातो.

  सिनेमॅटोग्राफी,संगित,नृत्य याबाबतीत चित्रपट उत्तम आहे.शाहरुख खान पडद्यावर दिसताच मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्या सर्वकाही सांगुन जातात पण लक्षात रहातो तो नवाजुद्दीन. हलक्याफुलक्या डायलाॅग मुळे नवाज़ुद्दीन ने एक वेगळाच ठसा उमटवला आहे.कित्येकदा शाहरुख आणि नवाजुद्दीन यांच्या पडद्या-वरील एकत्र सीन्स मध्ये नवाजुद्दीनच उजवा ठरतो.मोहम्मद ज़ीशान,अतुल कुलकर्णी यांनीही आपापली भुमिका चोख बजावली आहे.एकुणच काय गत चित्रपटाच्या अपयशामुळे शाहरुख खान ची या चित्रपटाकडुन असणारी अपेक्षा कितपत पुर्ण होईल हे पाहण्यासारखे आहे.पण प्रभावी  ट्रेलर आणि पब्लिसिटी यामुळे निर्माण झालेल्या अपेक्षांच्या आसपास हि हा चित्रपट पोहोचत नाहि.पण दंगल चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे ‘शाहरुख को कभी ना नही बोलते’ अशा शाहरुख़ प्रेमीसाठी साठी हा चित्रपट नक्किच एक पर्वणी ठरेल.


 


6 comments: