Monday, 24 February 2014

फैन्द्री… एक संघर्ष

वार मंगलवार , तो  दिवस जरा कंटाळवणाच होता. जयवंत आले ते फैन्द्री मराठी चित्रपट पाहण्याचा आग्रह करितच … त्यांना होकार देऊन करमणूक म्हणून पाहिलेला असा हा फौंड्री मराठी चित्रपट.


 अस्पृश, पद्द्द्लित समाजातील दलित वर्गाबद्दल बरेच लिखाण, चित्रपट  आले  आहे पण त्याच गटातील 'वडार' या समाजाला तसे दुर्लक्षित म्हणूनच पाहिले गेले आहे. चित्रपट सुरू होताच जास्त विलंब न लावता हळूहळू समाजातील भीषण अश्या वर्णव्यवस्तेचे चित्रण सादर करतो, मग ते रामोश्याचे पोर आले असा उल्लेख करणे असो वा डुक्कर शिवले की अंघोळ करणे असो … सर्वात विशेष म्हणजे हे सर्व आजही घडते आहे .

 चित्रपट पुढे कास धरायला सुरवात करतो. आपल्या समाजातील हि वर्णव्यवस्था मुळातच कर्मावर आधारित निर्माण झाली तरी पण, अमुक एक श्रेष्ठ , कनिष्ठ असा भेदभाव पाहताच लहानाचे मोठे होणारे आपण… याच विषयावर चित्रपट बोट ठेऊ  पहातो.

डूकाराने  शिवले म्हणून आंघोळ करणारी आणि त्यांना ते डुक्कर शिऊ नये म्हणून त्या डुकरांचा बंदोबस्त करणारी माणसे यातील संघर्ष दिग्दर्शकाने पोटतिडकीने दाखवला आहे. हा संघर्ष सर्व माणुसकीच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन जाउन पोहचलेला आपणास दिसतो. हा संघर्ष जगण्यासाठी नाही तर माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी आहे. " जातीसाठी खावी माती " असे म्हणतात, पण जर माती खाणच जर सत्य असेल तर हे सत्य शिवाहून सुंदर असूनही त्याचा काय उपयोग ?

सर्व आयुष्य वेदना सहन करण्यात गेलेले असताना म्हातारपणी चार सुखाचे दिवस बघण्याचा कचरु ला अधिकार का नाही? एक मुलगी नवऱ्याने सोडलेली ,दुसरीच्या लग्नाला हुन्द्यसाठी धावपळ, घरातील सर्वांचे पोटे भरण्यासाठी केलेली वणवण असा हा आयुष्यभर पुरेल एवढाच नाही तर मेल्यानंतरही पाठ न सोडणारा संघर्ष अंगावर काटा आणतो. एकट्या कचरूने संघर्ष करायचा तरी किती? आणि कोणाकोणा बरोबर ?

अशा या संघर्ष्यातून निर्माण होणाऱ्या वेदना मग त्या कचरुच्या असोत वा जब्याला जत्रेत नाचू न देता दिवा घेऊन उभा केल्यान झालेल्या जब्याच्या वेदना असोत, अश्याच वेदना सहन करून आता त्यातून नवीन पिढीत आलेला  नकार आपणास जब्यात दिसतो. हा नकार म्हणजेच प्रतिष्ठिताण विरुद्ध पुकारलेले बंडच होय. हे धाडस आता नव्या पिढीत दिसू लागले आहे. जब्याने पाटलाच्या हौदातील डुक्कर काढण्यास दिलेला नकार, शाळेतील मुलांसमोर डुक्कर पकडण्यास सुरवातीला नकार यातून ऎक बदलाच्या वाऱ्याची छोटीशी झुळूक वाहताना पहावयास मिळते.

विचार केल्यास हा नकार कश्यासाठी असा  मला प्रश्न पडतो. तर इतके वर्ष सहन करून आता आत्मभान जागे झाले आहे , या व्यवस्थेविषयी चिडच नव्हे तर या व्यवस्थेलाच आव्हान देण्यासाठी या नकार द्वारे उचलले हे मुंगीचे पाऊलच आहे. समाज्यात  सन्मानाने जगता यावे यासाठीच्या ओढीतून आलेला हा नकार आहे. शालू देखील येथे उच्चवर्णीयांचीच प्रतिनिधी असल्याचे जाणवते कारण जब्याची सन्मानाने जगण्यासाठीची धडपड तिलाही करमणूकच वाटते.

शेवटी जागृत झालेल्या आत्मभानाने वर्णव्यवस्था, जात, पात यावर भिरकावलेला दगड अतिशय योग्य असा शेवट. भिरकवलेला दगड हा कशाचे प्रतिक आहे? हे विचार करायला लावणारा आहे. नाठाळाच्या माथी मारलेली काठी म्हणजे हाच तो दगड तर नाही ना… ? चित्रपटात भव्यदिव्य सेट न दाखवता, समाजाची दुखरी नस पकडून दिग्दर्शकाने चित्रपट चाकोरी बाहेर विचार करायला लावणारा बनवला आहे. वेदना,विद्रोह,संघर्ष ,नकार आणि त्या नकारातून जागे झाल्यावर प्राप्त झालेल्या अत्मभानाने भिरकवलेला दगड थेट पाहणार्यांच्याच काळजावर कायमचा वार करून जातो….